काॅंग्रेस नेते राहुल गांधींच्या बहुचर्चित भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातील डोंगरकडा (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथे आहे. या यात्रेत युवासेना नेते आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज दुपारी सहभागी झाले. कालच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते या यात्रेत सहभागी झाले होते. आदित्य यावेळी राहुल गांधी यांच्याशी चालताना आणि चर्चा करतानाही दिसले.
महत्त्वाची बाब म्हणजे, राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेससोबत मित्रपक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असल्यानेत आज माजी पर्यावरणमंत्री आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे हे सहभागी झाले. ते पायी चालताना आज यात्रेत दिसले.
भारत जोडो यात्रा चोरांबा फाटा येथे पोहचली. त्यावेळी आदित्य ठाकरे या यात्रेत सहभागी झाले. ते नागरिकांसोबत काहीवेळ चालल्यानंतर राहुल गांधी यांच्यासोबत ते चालले. यावेळी त्यांनी राहुल गांधींशी चर्चाही केली. याचवेळी पन्नास खोके एकदम ओक्के! अशी घोषणाबाजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी देत शिंदे गटाला पुन्हा डिवचले.
ठाकरे गटाचे पदाधिकारीही सहभागी
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटातील नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारीही सामिल झाले आहेत. आदित्य ठाकरेंच्या सहभागाने महाविकास आघाडी आणखी मजबूत होणार असल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात आहे.
यात्रेचे आकर्षण
भारत जोडो यात्रेत अभूतपूर्व गर्दी आणि उत्साह आहे. राहुल गांधी यांच्या या यात्रेत हमाल, मापाडी, पोतराज, आदिवासी, शेतकरी, मजूर, बारा बलुतेदार, गोंधळी, बंजारा समाजाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत.