• Tue. Aug 19th, 2025

४८ जागांसाठी महाविकास आघाडीची जय्यत तयारी; फॉर्म्युला निश्चित होणार, मुहूर्तही ठरला!

Byjantaadmin

Aug 19, 2023

कोल्हापूर: तिन्ही पक्ष सध्या लोकसभेच्या संपूर्ण ४८ जागांची चाचपणी करत आहेत. महाविकास आघाडीचा लोकसभेच्या ४८ जागांसाठी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फॉर्म्युला ठरणार असून जागा वाटपाच्या मुद्द्यावरून राज्यात आमच्या कुठलाही वाद राहणार नाही. महाविकास आघाडीचे ४० खासदार कसे निवडून येतील यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे असे काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील म्हणाले आहेत ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे येत्या २५ तारखेला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. शिवाय शरद पवार यांची दसरा चौकात जाहीर सभा देखील पार पडणार असून शरद पवार यांच्या स्वागताची जय्यत तयारी महाविकास आघाडीकडून सुरू आहे. शरद पवार हे २५ ऑगस्टला कोल्हापुरात आल्यावर आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्यांचे उत्साहात स्वागत करणार आहोत. कोल्हापुरकरांचे नेहमीच त्यांच्यावर प्रेम राहिले आहे. असे म्हणत लोकसभेची तयारी आम्ही तीनही पक्ष करत आहोत. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरेल, असे सतेज पाटील म्हणाले आहेत.

तसेच सध्या तिन्ही पक्ष संपूर्ण ४८ जागांची चाचप्पणी करत असून वरिष्ठ मंडळी निर्णय घेतील. कोल्हापूर आणि हातकणंगले जागेबाबत देखील चर्चा सुरू आहेत. वरिष्ठ जे काही निर्णय घेतील, त्याप्रमाणे आम्ही काम करू. कोल्हापुरात पुरोगामी विचारांचा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा, अशी आमची इच्छा आहे. मात्र श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची इच्छा काय आहे हे पाहणं महत्वाचे आहे. महाराजांबद्दल आम्हाला आदरच आहे, असे सतेज पाटील म्हणाले आहेत. राज्यात काय कधी होईल हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे आणि याचा परिणाम प्रशासनावर आहे. लोकांची कामे होतं नाहीत. केलेल्या विकास कामाचे पैसे मिळत नाहीत. राज्यात नेमकी सत्ता कोणाची आहे आणि सत्ता कोणी चालवायची हा वाद निर्माण झाला आहे. पूर्वी ते आमच्यावर टीका करत होते. तीन पक्ष एकत्र आलेत म्हणून मात्र आता तीच परिस्थिती त्यांची आहे. किमान आमच्या वेळेस उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात एकदिलाने काम करायचे. मात्र आता त्यांच्यात कोण न जेवायला जातं ना कोण जातं नाही. याचा डायरेक्ट परिणाम विकासावर होत आहे, अशी टीका सतेज पाटील यांनी सरकार वर केली आहे.राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अनेक कामांना स्थगिती देण्यात आली. मात्र या स्थगितीला उच्च न्यायालयातून आम्ही स्थगिती आणून कामांना सुरूवात केली. मात्र दुर्दैवाने कोल्हापुरातील तब्बल दहा कोटी रुपयांचे पहिलं इनडोअर स्टेडियम होणार होतं. मात्र याला स्थगिती आणण्याचे पाप खासदार धनंजय महाडिक यांनी केले असल्याची माहिती समोर आल्याचे सतेज पाटील म्हणाले आहेत. तसेच याचा निधी दुसरीकडे वळवला असल्याची ही माहिती मिळाली असून याचा धनंजय महाडिक यांनी खुलासा करावा, असे पाटील म्हणाले आहेत. शिवाय सत्ता तुमची आहे. खिरापत वाटत आहात तर वाटा. मात्र इनडोअर स्टेडियमचा निधी दुसरीकडे वळवणे हे चुकीचं असून खेळाडूवर अन्याय आहे, असे सतेज पाटील म्हणाले आहेत. शिवाय कोल्हापूरला गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून आयुक्त मिळत नाही आहे. यावरूनच शासन किती गतिमान आहे याची ही प्रचिती आहे, असा टोला ही त्यांनी सरकार ला लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *