• Tue. Aug 19th, 2025

शासकीय भिक्षेकरीगृहातील महिला, पुरुषांना स्वावलंबी करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम –  मंत्री आदिती तटकरे

Byjantaadmin

Aug 19, 2023

मुंबई, दि. १९ : चेंबूर येथील शासकीय पुरुष आणि महिला भिक्षेकरीगृह आणि मानखुर्द येथील दि चिल्ड्रेन्स एड  होम,  मुले तसेच  मुलींचे नवीन बालगृह, गतिमंद  मुलांसाठीचे  बालगृह, चिल्ड्रेन्स एड सोसायटीची प्राथमिक व माध्यमिक शाळा यांना, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अलीकडेच भेट देऊन  तिथे  देण्यात येणाऱ्या  वैद्यकीय सुविधा, अन्न-धान्याची गुणवत्ता, स्वयंपाकाच्या ठिकाणी असणारी स्वच्छता तसेच बालकांच्या सुरक्षिततेबाबत पाहणी केली. तिथे तयार करण्यात आलेल्या जेवणाची चवही  चाखून तिची गुणवत्ता त्यांनी तपासली. मानखुर्दमधील  नवीन तसेच अतिरिक्त बालगृह येथील  मुलींनी कोळीनृत्याने  मंत्री आदिती तटकरे यांचे स्वागत केले.

भिक्षेकरी प्रवृत्तीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना  केल्या जाव्यात,  भिक्षेकरीगृहातील  महिला व पुरुषांना स्वावलंबी करण्यासाठी  कमी कालावधीचे कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबविण्याचे  निर्देश मंत्री कु. तटकरे यांनी  प्रशासनाला दिले. यावेळी महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची त्यांनी पाहणी केली.

तेथील बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये  दिले जाणारे प्रशिक्षण याबाबत यावेळी त्यांनी माहिती घेतली. बालके आणि अधिकारी- कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त तथा दि चिल्ड्रेन्स एड सोसायटीचे मुख्याधिकारी बापूराव भवाणे, मुंबई उपनगर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी.एच.नागरगोजे, मुंबई शहर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी शोभा शेलार व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *