नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो तरुणांच्या भवितव्याशी भाजपप्रणित राज्यातील तीन पक्षांचे येडे सरकार खेळ खेळत आहे. नोकर भरती प्रक्रियेत घोटाळा झाला नाही अशी एकही परीक्षा होत नाही. एकूणच सरकारला परीक्षाही घेता येत नाहीत. तलाठी परीक्षेचा पहिलाच पेपर फुटला.त्यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर व त्यातही गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शुक्रवारी मुंबईत हल्लाबोल केला. फडणवीसांनी पक्ष फोडणे बंद करुन पेपर फोडणाऱ्यांचे कंबरडे मोडावे, असा टोला त्यांनी लगावला.
राज्य सरकार सातत्याने पेपरफुटी होत असूनही त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याबद्दल पटोलेंनी संताप व्यक्त केला. तलाठी परीक्षेच्या पेपर फुटीमागे जे लोक असतील,त्या सर्वांचा छडा लावून कठोर शिक्षा करा. जेणेकरून भविष्यात कोणीही अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणार नाही, अशी मागणी त्यांनी केली.नोकर भरतीच्या नावाखाली राज्यातील तीन पक्षांचे येडे सरकार तरुणांची क्रूर थट्टा करत आहे,असा हल्लाबोल पटोलेंनी केला.तलाठी परिक्षेतून सरकारने एक अब्ज ४ कोटी १७ लाख रुपयांचे परीक्षा शुल्क घेतले,पण, परीक्षार्थींना पसंतीचे परीक्षा केंद्रही दिले नाही. त्यांना ते जिल्ह्याबाहेर दूरचे देण्यात आले. त्यामुळे हजारो परिक्षेला मुकले. त्यात पेपर फुटल्याने अभ्यास करणाऱ्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरले,असे ते म्हणाले.
फडणवीसांनी पक्ष फोडणे बंद करुन….
देवेंद्र फडणवीसां पक्ष फोडणे बंद करुन पेपर फोडणाऱ्यांचे कंबरडे मोडावे,तरुणांच्या भवितव्याशी सुरु असलेला खेळ तिघाडी सरकारने थांबवावा, अन्यथा तरुण परीक्षार्थी रस्त्यावर उतरले, तर सरकारला ते महागात पडेल असा इशारा त्यांनी दिला आहे. राज्यात यापूर्वी झालेल्या परिक्षांचे पेपर फुटल्याचा प्रश्न विधानसभेत पुराव्यासह उपस्थित केला असता गृहमंत्री फडणवीस यांनी पेपर फुटीच्या खोट्या बातम्या असल्याचे सांगत त्या देणाऱ्या प्रसार माध्यमांवरच हक्कभंग आणण्याचा इशारा दिला होता,याकडे पटोलेंनी लक्ष वेधले.एकतर, या सरकारला नोकर भरती प्रक्रिया व्यवस्थित पार पाडता येत नाही, दोषींना शिक्षा करण्याची मानसिकताही त्यांची नाही, उलट पेपर फुटीच्या बातम्या देणाऱ्यांवर हक्कभंग आणण्याचा इशारा दिला जातो, हे अत्यंत आक्षेपार्ह व निर्ढावलेल्या मनोवृत्तीचा प्रकार आहे,असे कोरडे त्यांनी महायुती सरकारवर कोरडे ओढले.