• Sat. Aug 16th, 2025

भाजपसोबत जाणाऱ्यांना गाडीत झोपावं लागतं, अजितदादांची मिमिक्री करत राज ठाकरेंची सडकून टीका

Byjantaadmin

Aug 16, 2023

नवी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंचन घोटाळ्यासंदर्भात भाष्य केल्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसोबत टुणकन उडी मारून सत्तेत सामील झाले, अशी बोचरी टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली. गेल्या काही महिन्यांमध्ये भाजपशी जवळीक वाढवल्यामुळे चर्चेत असणाऱ्या राज ठाकरे यांनी पनवेलमधील एका कार्यक्रमात जोरदार राजकीय फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था आणि अन्य मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले.या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोचऱ्या भाषेत टीका केली. भाजपमध्ये लोकांना कनपटीवर बंदूक ठेवून पक्षात आणले जाते. मग लोकांवर गाडीत झोपून जायची वेळ येते.

Raj Thackerya Ajit Pawar

काही दिवसांपूर्वीच अजित पवार आणि शरद पवार यांच्यात पुण्यातील एका उद्योजकाच्या घरी गुप्त बैठक झाली होती. येथून बाहेर पडताना अजित पवार प्रसारमाध्यमांना चुकवण्यासाठी गाडीच्या सीटवर आडवे पडले होते. याच मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी अजित पवार यांना आपल्या खास शैलीत लक्ष्य केले. यावेळी राज ठाकरे यांनी अजित पवार यांची नक्कल करुन दाखवली. अजित पवार, ‘मी तुला दिसलो का गाडीमध्ये, मी गाडीत झोपलो होतो का?’ असा प्रश्न विचारतात. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. आपण या सरकारमध्ये का आला आहात? अजित पवारांना हा प्रश्न विचारल्यानंतर ते , ‘मला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे’, असे सांगतात. कशाल खोटं बोलता? सरकारमध्ये सामील होण्याच्या सहा दिवस आधी पंतप्रधान मोदी यांनी काढली ना तुमची, महाराष्ट्रात ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले. मोदींच्या या वक्तव्यानंतर सगळेजण टुणकन उडी मारून दुसऱ्या बाजूला आले. कारण छगन भुजबळ यांनी अजित पवारांना सांगितलं असेल, आतमध्ये (तुरुंगात) काय परिस्थिती असते. जाऊ नका, इथे जाऊ आपण, तिकडे नको, असा सल्ला भुजबळ यांनी अजित पवारांना दिला असेल, अशी खोचक टिप्पणी राज ठाकरे यांनी केली.

अमित ठाकरेंवर तुटून पडणाऱ्या भाजपच्या नेत्यांना राज ठाकरेंच्या कानपिचक्या

मनविसेचे अध्यक्ष आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांची गाडी काही दिवसांपूर्वी नाशिकमधील टोलनाक्यावर बराचवेळ अडवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी हा टोलनाका फोडला होता. त्यावरुन भाजपच्या नेत्यांनी अमित ठाकरे यांना लक्ष्य केले होते. भाजपच्या या टीकेचा राज ठाकरे यांनी आजच्या कार्यक्रमात समाचार घेतला. भाजपने अमित ठाकरे आणि मनसेला उद्देशून, ‘कधीतरी रस्ते आणि टोलनाकेही बांधायला शिका’, अशी बोचरी टीका केली होती. या टीकेची राज ठाकरे यांनी सव्याज परतफेड केली. भाजपने इतरांचे आमदार न फोडता स्वत:चा पक्ष बांधायला शिकावे, अशी मार्मिक टिप्पणी राज ठाकरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *