कळवा रुग्णालयाच्या प्रकरणावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले, या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल येताच दोषींवर कारवाई केली जाईल.
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १२ तासात १७ रुग्णांचा मृत्यू झाला असून यामुळे सरकारही हादरले आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचाअहवाल येताच दोषींवर कारवाई केली जाईल. या प्रकरणी चौकशी समिती तयार करण्यात आली असून चौकशी अहवाल मागवला आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे.
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. १२ तासांत म्हणजेच शनिवार रात्रीपासून ते रविवार सकाळपर्यंत १७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणानंतर विरोधकांनीही राज्य सरकार व महापालिका प्रशासनास धारेवर धरले आहे. यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले, ठाणे रुग्णालयातील घटनेबाबत मी सातत्याने माहिती घेत आहे. मी स्वतः तिथल्या आयुक्तांशी बोलत आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत हे हॉस्पिटल येते. ही घटना कशामुळे घडली, याचा अहवालएक ते दोन दिवसांत येईल. १३ जणांचा मृत्यू हा आयसीयूमध्ये झाला आहे. तर इतर ४ हे जनरल वार्डमधील आहेत. याबाबत डीनचे दुर्लक्ष झालं का हे पाहावं लागेल, पण अतिशय दुर्दैवी घटना आहे.चौकशी समितीचा अहवाल येताच याबाबत कारवाई करण्यात येईल. हे प्रकरण कशामुळे झालं आहे, याच्या मुळापर्यंत आम्ही जाणार आहोत. आता चौकशी समिती तयार करण्यात आली आहे. या प्रकरणाचा चौकशी अहवाल मागवला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि गिरीश महाजन हे दोघेही या घटनेवर लक्ष ठेऊन आहेत, अशी माहिती सावंत यांनी दिली.