मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या आरोग्य संस्थांत वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांचा समावेश असतो. हे रुग्ण वैद्यकीय उपचारांविना राहू नयेत, यासाठी १५ ऑगस्टपासून सार्वजनिक आरोग्य संस्थांमधून देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहेत. ही योजना प्रभावी राबवण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
जनजागृती करण्याचे निर्देश
आरोग्य संस्थेच्या आवारात यासंदर्भात माहिती दर्शनी भागामध्ये फलक लावावेत, आरोग्य संस्थेच्या रुग्णसेवेबाबत शुल्क आकारल्याची तक्रार टोल फ्री १०४ क्रमांकावर करता येईल, याची सुस्पष्ट जनजागृती करण्यात यावी. टोल फ्री १०४ क्रमाकांवर प्राप्त झालेल्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेतली जाईल. त्यासंदर्भात संबंधित संस्थाप्रमुखाला तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांना माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.