उद्या निलंग्यात माजी मंत्री आ.अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा मेळावा
निलंगा(प्रतिनिधी) : -पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व पक्षाचे धोरण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शुक्रवार (दि ११) रोजी सकाळी अकरा वाजता येथील वृंदावन मंगल कार्यालयात माजीमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी, कार्यकर्ता मेळावा व धोंडे जेवण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर राहणार आहेत. यावेळी आमदार धीरज देशमुख, प्रदेश सचिव अभय साळुंके, जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, मल्लिकार्जुन मानकरी उपस्थित राहणार असल्याचे आयोजक डॉ. अरविंद भातांब्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले, सध्या महागाई, बेरोजगारी, अशांतता या विषयांमुळे संपूर्ण देशात भाजपविरोधात वातावरण निर्माण झाले आहे. जनतेच्या काँगेसकडून अपेक्षा आहेत. आगामी काळात पक्षाची ध्येयधोरणे, पक्षाचा कार्यक्रम जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगत आम्ही सर्व एकसंघ आहोत. एकदिलाने पक्षवाढीसाठी प्रयत्न करीत आहोत. निवडणुकीत पक्ष कोणाला उमेदवारी देईल माहिती नाही. परंतु, आम्ही आता जिंकण्यासाठी लढणार आहोत, असे त्यांनी सांगितले. अरविंद भातांब्रे म्हणाले, अधिकमास महिन्यात व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण होतात. यामुळे धोंडे जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंत काँग्रेस पक्षाची सत्ता येवो, हीच सर्वांची इच्छा आहे. ती पूर्ण होणार असल्याची खात्री त्यांनी व्यक्त करत मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. मेळाव्याच्या अनुषंगाने पानचिचोली येथे काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केले. यावेळी मेळाव्याचे संयोजक डॉ. अरविंद भातांब्रे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, कार्याध्यक्ष अॅड. नारायणराव सोमवंशी, तालुका संघटन सरचिटणीस राजकुमार कत्ते, तालुका प्रवक्ता चक्रधर शेळके, तालुका उपाध्यक्ष गंगाधर चव्हाण, प्रमोद मरूरे, तालुका सरचिटणीस बालाजी भुरे, विकास पाटील, महेश देशमुख, शकील पटेल, श्रीकांत साळुंके, माधव पाटील, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मदन बिराजदार, उपाध्यक्ष अमोल नवटके यांसह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पत्रकार परिषदेस अशोकराव पाटील निलंगेकर, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, शिरूर अनंतपाळचे तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, माजी पंचायत समिती सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, प्रा. दयानंद चोपणे, प्रवक्ते चक्रधर शेळके, युवक काँग्रेसचे अमोल सोनकांबळे उपस्थित होते.