महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. कारण सुप्रीम कोर्टाने इंदुरीकर महाराज यांना दिलासा देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवत इंदुरीकर महाराज यांना मोठा दणका दिला आहे. त्यामुळं आता पुढील काही तासांत इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातूनही दिलासा न मिळाल्याने इंदुरीकर महाराजांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिर्डी येथील कार्यक्रमात बोलताना इंदुरीकर महाराज यांनी महिलांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.शिर्डीच्या ओझरमधील कार्यक्रमात बोलताना इंदुरीकर महाराज बोलताना म्हणाले होते की, सम तारखेला शारीरिक संबंध झाले तर मुलगा होतो आणि विषम तारखेला शारीरिक संबंध प्रस्थापित केले तर मुलगी होते, असं वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यानंतर अनेक सामाजिक संघटना तसेच स्त्रिवादी कार्यकर्त्यांनी इंदुरीकर महाराज यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. इंदुरीकर महाराज यांचं वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरातीला पाठिंबा देणारं असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर PCPNDT सल्लागार समितीने इंदुरीकर महाराज यांना नोटीस जारी करत कायदेशीर कारवाई कारवाई करण्याचे आदेश जारी केले होते. परंतु सत्र न्यायालयाने कारवाई करण्याचा आदेश देणारी नोटीस रद्द केली होती.
त्यानंतर सत्र न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध वकील रंजना गवांदे यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यानंतर हायकोर्टाने सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला होता. त्यानंतर इंदुरीकर महाराज यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. परंतु आता सुप्रीम कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावत इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.