शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत यांना जामीन न्यायालयाने मंजूर केला होता. तब्बल १०० दिवसानंतर संजय राऊत यांना पीएमएल न्यायालयाने दिलासा दिला होता. पण, संजय राऊत यांच्या जामिनाला अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) न्यायालयात विरोध केला होता. त्यानंतर ईडीला मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने ईडीची मागणी फेटाळली आहे.
न्यायालयाने संजय राऊत आणि त्यांचे सहकारी प्रवीण राऊत यांना जामीन मंजूर केला होता. पण, संजय राऊतांच्या जामिनाला ईडीने विरोध करत दाद मागण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली होती. ‘तपास यंत्रणेला उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. आम्हाला ठराविक वेळ द्यावा असे नाही. मात्र, आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी आदेशाला स्थगिती द्यावी,’ असे ईडीने न्यायालयात म्हटलं होतं.
तर, ईडीच्या मागणीचा प्रवीण राऊत यांच्या वतीने विरोध करण्यात आला. “जामीन मिळाला असला तरी आम्ही कुठेही पळून जाणार नाही. तपास यंत्रणेला त्यांचा कायदेशीर मार्ग निवडण्याचा अधिकार आहे. उच्च न्यायालय आजपासून नियमित सुरू झालं आहे. त्यामुळे तिथे ईडीने तिथे दाद मागावी,” असं प्रवीण राऊत म्हणाले.
दरम्यान, संजय राऊत यांच्या जामिनाला विरोध करणारी ईडीची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर, या विरोधात ईडी उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.