• Fri. May 2nd, 2025

विरोधीपक्ष नेतेपदाची घोषणा झाली! अजित पवारांनी हाताला धरून वडेट्टीवारांना बसवलं खुर्चीवर

Byjantaadmin

Aug 3, 2023

विजय वडेट्टीवार यांच्या नावाची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी घोषणा करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या नावाची घोषणा सभागृहात केली आहे. त्यानंतर सभागृहात सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विजय वडेट्टीवार यांच्या हाताला धरुन विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर बसवलं आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात मोठे बदल झाले आहेत. शिवसेना-भाजपला पाठिंबा दिल्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेता कोण? असा प्रश्न निर्माण झाला होता.अखेर काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर विधानसभेत काँग्रेस पक्षाचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून कुणाला विरोधी पक्षनेतेपद दिलं जाणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादीकडून विजय वडेट्टीवार आणि संग्राम थोपटे यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, अखेर विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

”विरोधी पक्षनेता निवडला की तो विरोधी पक्षात जातो…” वडेट्टीवारांच्या निवडीनंतर थोरात थेटच बोलले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, काँग्रेस पक्षाने आज विजय वडेट्टीवार यांचं नाव विरोधीपक्ष नेते पदासाठी निश्चित केलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यासाठी पत्र दिले आहे. यापूर्वी विरोधीपक्ष नेता निवडला गेला की तो इतर पक्षात जातो, हा इतिहास खरा असला तरी आमच्याकडे तसं काही होणार नाही. विजय वडेट्टीवार हे काँग्रेस विचारसरणीचे आहेत, असं थोरातांनी स्पष्ट केलं.बाळासाहेब थोरांतांचा रोख नेमका कुणाकडे? अशा चर्चा यानिमित्ताने महाराष्ट्रात सुरु झालेल्या आहेत. विरोधी पक्षनेते पदावर राहून, पक्षांतर अथवा बंडखोरी केलेल्यांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील, एकनाथ शिंदे, अजित पवार या नेत्यांचा समावेश आहे.महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता पद काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. विधीमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडेच राहणार आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर पक्षाने हा निर्णय जाहीर केला.काँग्रेसमध्ये असलेल्या दुसऱ्या फळीतील नेत्याकडे ही जबाबदारी मिळण्याची शक्यता याआधी वर्तवण्यात आली होती. सुनील केदार, विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे यांच्या नावाची काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा होती. त्यानुसार आज विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर बाळासाहेब थोरात काँग्रेसचे गटनेते राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *