• Tue. Apr 29th, 2025

सर्व विभागांच्या सहभागाने महसूल सप्ताह यशस्वी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

Byjantaadmin

Aug 2, 2023

पुणे, दि. १ : महसूल सप्ताह महसूल विभागापुरता मर्यादित न ठेवता सर्व विभागांना सहभागी करुन यशस्वी करावा आणि सप्ताहाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांची कामे गतीने पूर्ण करावीत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

विधानभवन येथे विभागीय आयुक्तालयातून राज्यस्तरीय महसूल दिन व महसूल सप्ताहाचा शुभारंभ तसेच सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद कार्यक्रमात श्री. पवार बोलत होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, विभागीय आयुक्त सौरभ राव, राज्याचे जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल  सोनवणे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे राज्याच्या प्रशासनाचा नावलौकिक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. फक्त कणा मजबूत असून चालणार नाही तर संपूर्ण शरीर मजबूत असावे लागते. त्यासाठी कृषी, आरोग्य, सिंचन, जलसंपदा, सहकार यासह अन्य सर्व विभागांना एकत्र घेऊन काम करावे. अधिकाऱ्यांनी प्रशासनाची कामगिरी उत्तम होईल यासाठी प्रयत्न करावेत. प्रशासकीय व्यवस्था अधिक गतिमान करण्याचे काम करताना परस्पर समन्वय ठेवावा.

नागरिकांची कामे वेळेत करण्यासोबत जनकल्याणकारी योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून लोकाभिमुख काम करावे. शासकीय योजनांमध्ये लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या निमित्ताने आपले जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी लोकांपर्यंत जात आहेत. या माध्यमातून राज्यभरात सुमारे १ कोटी नागरिकांना विविध शासकीय लाभ देण्यात आले आहेत. शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी महसूल विभागाने नेहमीच अग्रेसर राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

राज्यात प्रथमच महसूल सप्ताहाचे आयोजन होत आहे. महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्याचा हा एक प्रयत्न आहे. अन्य विभागांना प्रोत्साहन देणारा ठरेल असा महसूल सप्ताह यशस्वी होईल, असा विश्वास महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमामध्ये महसूल विभागाचे चांगले योगदान आहे. समाजातील प्रत्येक घटक या उपक्रमामध्ये सहभागी होत आहे. महसूल विभागाने अधिक गतिमान पद्धतीने काम करावे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने महसूल सप्ताह यशस्वी होईल. सैनिकांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे जमिनीचे प्रश्न निकाली निघावेत त्यासाठी या सप्ताहामध्ये  ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ असा एक दिवस ठेवण्यात आला आहे. या निमित्ताने सैनिकांना न्याय देण्याचे काम व्हावे.

प्रास्ताविकात श्री. देवरा यांनी महसूल सप्ताहाच्या आयोजनाचे महत्त्व सांगून या सप्ताहाची रुपरेषा विषद  केली. तर आभार व्यक्त करताना विभागीय आयुक्त श्री. राव यांनी महसूल सप्ताहानिमित्त राबविण्यात येणारे उपक्रम पुढील वर्षभर त्याच पद्धतीने राबविले जातील अशी ग्वाही दिली.

यावेळी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तसेच जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी, कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed