• Tue. Jun 10th, 2025

भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी मुस्लीम चेहरा; कोण आहेत आमदार तारिक मन्सूर?

Byjantaadmin

Jul 30, 2023

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. आगामी महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणूक तसेच लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून नव्या नेत्यांच्या निवडीची यादी सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपने आमदार तारिक मन्सूर यांची पहिल्यांदाच राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तारिक मन्सूर यांना गेल्या वर्षीच भाजपाने विधानपरिषदेतून आमदार केलं होतं. त्यानंतर आता त्यांची थेट पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यपदी वर्णी लागल्याने भाजपने अल्पसंख्यांकांना प्रतिनिधीत्व देण्यास सुरुवात केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कोण आहेत तारिक मन्सूर?

तारिक मन्सूर हे उत्तर प्रदेशातील विधानपरिषदेचे आमदार आहे. तारिक मन्सूर हे देशातील प्रतिष्ठित अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहे. बोहरा समाजाचे धर्मगुरू मुदफ्फल सैफुद्दीन यांची अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर तारिक मन्सूर यांना भाजपकडून विधानपरिषदेवर घेण्यात आलं होतं. तारिक मन्सूर हे पसमंदा मुस्लीम समाजातून येतात. त्यामुळं लोकसभा निवडणुकीपूर्वी पसमंदा समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजपकडून ही राजकीय खेळी केल्याचं बोललं जात आहे. यापूर्वी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये पसमंदा मुस्लिमांसह अन्य अल्पसंख्याकांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून मेळावे घेण्यात आले होते. पक्षाच्या शीर्ष नेत्यांनी पसमंदा मुस्लीम नेत्यांशी संपर्क साधला होता. त्यानंतर आता आमदार तारिक मन्सूर यांना थेट भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *