सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १० किंवा ११ ऑगस्टपर्यंत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांना अपात्रतेसंदर्भातील निर्णय घ्यायचा आहे. त्यात कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘सेंड ऑफ’ दिला जाईल आणि अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं जाईल, अशी भविष्यवाणी काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. मात्र, भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या गोष्टीचा सोमवारीच इन्कार केला आहे. मात्र, त्यानंतरही काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी यांनी अजितदादा मुख्यमंत्री होणार, हे सांगितले आहे.आमदार वंजारी म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवसांपूर्वी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेले होते.
पंतप्रधानांना एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने भेटणे, हे काही चुकीचे नाही. हे सार्वत्रिक आहे, ते होतच राहते. पण, कुटुंबासह पत्नी, मुलगा, नातवंडांसोबत पंतप्रधानांना भेटणं म्हणजे ‘सेंड ऑफ’ तर नाही ना, अशी चर्चा विधीमंडळातील आमदारांमध्ये पहायला मिळत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत इन्कार केला असला तरी राजकारणात अशा खेळी थोडीच सांगितल्या जातात. प्रत्येक दिवशी काय घडत असते, ते सांगायचं नसतं. शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये अजित पवार हे सामील होणार आहेत, हे तर कुठे सांगितले होते? असा सवालच अभिजित वंजारी यांनी केला आहे.
आमदार वंजारी म्हणाले की, ज्या सगळ्या खेळी आहेत, ज्या हालचाली सुरू आहेत, त्या सांगितल्या जात नाहीत. ज्या दिवशी हे घडेल, त्या दिवशी सांगितलं जाईल, की आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत