लातूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बंदूक साफ करताना गोळी लागून माजी सैनिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुशील कावळे असं या माजी सैनिकाचं नाव आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. सुशील कावळे हे त्यांच्या घरात बंदूक साफ करत होते, याचवेळी ही घटना घडली.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, माजी सैनिक सुशील कावळे यांचे लातूर शहरातील विशाल नगर भागात घर आहे. सकाळी अकरा वाजता सुशील कावळे हे त्यांच्या रूममध्ये बंदूक साफ करत होते, याचदरम्यान मोठा आवाज झाला. घरातील लोकांनी आवाजाच्या दिशेनं धाव घेतली तर कावळे यांना गोळी लागल्याचं दिसून आलं. त्यांची पिस्तूल त्यांच्या बाजूल पडलेली होती. दरम्यान घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धावा घेतली. पोलिसांनी कावळे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे.
पोलिसांकडून तपासाला सुरुवात
दरम्यान बंदूक साफ करताना त्यांना गोळी लागली असावी असा प्राथमीक अंदाज आहे. मात्र त्यांनी आत्महत्या केली आहे का? की काही घातपात आहे अशा सर्व बाजुनं पोलीस आता या घटनेचा तपास करत आहेत.