मुंबई : राज्यात सध्या वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षातून बंडखोरी करत भाजपशी घरोबा केला आहे. दरम्यान, त्यांच्या सत्तेत प्रवेशामुळे शिंदे गटाची अस्वस्था वाढली आहे. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत. काल रात्री देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहे. ते दिल्लीला जाताच अजित पवार यांच्या विश्वासू आणि कट्टर समर्थक असलेल्या आमदाराने ‘राज्यात लवकरच अजित पर्व’ असे ट्विट केले असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी करत सत्तेत सहभाग घेतला. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत त्यांनी मोदींचे गोडवे गायला सुरुवात केली. दरम्यान, त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांची मुख्यमंत्री पदाची मनीषा देखील जाहीर केली होती. अजित पवार यांच्या सत्ता प्रवेशामुळे राज्यात पुन्हा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू झाल्या. उद्धव गटाने शिंदे गटावर प्रहार करत लवकरच मुख्यमंत्री बदलणार असूंन शिंदे गटाला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल अशी टीका केली होती. तेव्हा पासून मुख्यमंत्री शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू झाल्या आहेत.दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तारत शिंदे गटाला नाकारत अजित गटाला झुकते माप दिल्याने शिंदे गटात कुरबुरी सुरू असल्याचे उघड झाले आहे. हा सर्व राजकीय धुरळा सुरू असतांना काल शिंदे दिल्लीला रवाना होताच अजित पवार यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्वीटमुळे शिंदेंच्या आमदारांची चिंता वाढली आहे. सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या वाढदिवशी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
एकनाथ शिंदे हे एका कार्यक्रमाला दिल्लीला गेले असले तरी ते त्या ठिकाणी भाजप पक्ष श्रेष्ठींची भेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुन्हा ते वाटाघाटी करण्याची शक्यता आहे. मात्र, असे सुरू असतांना राज्यात मिटकरी यांनी केलेल्या ट्विटमुळे मात्र, चर्चा सुरू झाल्या आहेत. मिटकरी यांनी ट्विट सोबत व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडिओला ‘मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व’ असं कॅप्शनही देत त्यांनी अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, अमोल मिटकरी यांच्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.