आरक्षणाच्या मुद्द्यावरून मागील तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारानं कळस गाठला आहे. नराधम समाजकंटकांनी काल दोन महिलांची नग्न धिंड काढली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं देश हादरला असून सर्वोच्च न्यायालयानं याची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयानं केंद्र व राज्य सरकारला थेट इशाराच दिला आहे.सर्वोच्च न्यायालयानं या घटनेची स्वत:हून दखल घेतली आहे.सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मणिपूरमध्ये घटलेली घटना हे मोठं घटनात्मक अपयश आहे. राज्य सरकारनं यावर तातडीनं कारवाई करावी. नेमकी काय कारवाई केली आणि महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार काय उपाययोजना करतंय याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.
मणिपूरमधील व्हिडिओ हादरवून टाकणारा आहे. या घटनेमुळं आम्ही दु:खी व चिंतीत आहोत. हे अजिबात स्वीकारार्ह नाही. सरकारनं तातडीनं पावलं उचलून कारवाई करायला हवी. सरकारनं काही केलं नाही तर आम्ही स्वत: या संदर्भात कारवाई करू, असा इशाराच सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २८ जुलै रोजी घेतली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.हिंसाचारात महिलांचा वापर होणं हे धक्कादायक आहे. जे काही झालं ते घटनात्मक आणि मानवी अधिकारांचं सर्रास उल्लंघन आहे. या प्रकरणात सरकार काय करतंय त्याची माहिती न्यायालयाला मिळाली पाहिजे, जेणेकरून अशा हिंसाचारात सामील असलेल्या गुन्हेगारांना शिक्षा करता येईल, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
मणिपूरमध्ये नेमकं काय घडलं?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही लोकांचा जमाव दोन महिलांची नग्न धिंड काढत असल्याचं आणि त्यांचा विनयभंग करत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर या महिलांना शेतात नेऊन त्यांच्यावर बलात्कार झाल्याची माहिती समोर आली आहे. मणिपूरची राजधानी इम्फाळपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे रोजी ही घटना घडली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मणिपूर पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपी हेरादास (वय ३२) याला थौबल जिल्ह्यातून अटक केली आहे. हेरादास या व्हिडिओत हिरव्या टी-शर्टमध्ये दिसला होता.
मणिपूर पुन्हा हादरलं.. सामूहिक बलात्कार करून महिलांना रस्त्यांवरून निर्वस्त्र फिरवलं, व्हायरल व्हिडिओनंतर संतापाची लाट
का समुदायाच्या दोन महिलांना दुसऱ्या समुदायाचे लोक निर्वस्त्र करून रस्त्यावरून फिरवत आहेत. ही घटना समोर आल्यानंतर मणिपूर पुन्हा अशांत झाले आहे.
मणिपूरमधील स्थिती शांत होण्याऐवजी धूमसत चालली आहे. ईशान्येकडील या राज्यात खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. ४ मे २०२३ रोजीचा एक व्हिडिओ आज समोर आला आहे. यामध्ये एका समुदायाच्या दोन महिलांना दुसऱ्या समुदायाचे लोक निर्वस्त्र करून रस्त्यावरून फिरवत आहेत. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे व्हिडिओ इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम (ITLF) च्यागुरुवारी होणाऱ्या आंदोलनाच्या एक दिवस आधीच व्हायरल झाले आहेत.दरम्यान पोलिसांनी सांगितले की,अज्ञात शस्त्रधारी आरोपींविरुद्ध थौबल जिल्ह्यातील नोंगपोक सेकमाई पोलीस ठाण्यात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या आरोपाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश –
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी माध्यमांना सांगितले की, सरकारने व्हायरल व्हिडिओची दखल घेतली आहे. त्यामध्ये दोन महिलांना जमावाने निर्वस्त्र करून ओढत नेले आहे. बी.फेनोम गावातील ६५ वर्षीय प्रमुख थांगबोई वैफेई यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की, तिसऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.
महिलांना निर्वस्त्र करून शेतात फटफटत नेले –
हिंसाग्रस्त मणिपूरमध्ये आज जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ती घटना ४ मे रोजी कांगकोपी जिल्ह्यात झाली होती. यामध्ये लोकांचा समूह दोन महिलांना निर्वस्त्र करून शेतातून फरफटत नेत असल्याचे दिसते. घटनेचा निषेध करणाऱ्या इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमने दावा केला आहे की, महिला कुकी-जो जमातीच्या आहेत. तर त्यांच्यावर अत्याचार करणारा जमाव मैतेई समुदाय आहे.घटनेनंतर एक महिन्याने २१ जून रोजी गुन्हा नोंद करण्यात आला.IPC कलम १५३ ए, ३९८, ४२७, ४३६, ४४८, ३०२, ३५४, ३६४, ३२६, ३७६, ३४ आणि शस्त्र अधिनियम कलम २५(१ सी) नुसार गुन्हा दाखल केला आहे.