राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांची साथ देत सत्ताधारी युतीत सहभागी झालेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं पद धोक्यात आलं आहे. काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी चाकणकर यांच्या पदास आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली आहे.अजित पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेणाऱ्या चाकणकर यांची राष्ट्रवादीच्या फुटीर गटाच्या महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याच निर्णयास संगीता तिवारी यांनी आक्षेप घेतला आहे. तिवारी यांनी थेट उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी राज्यपाल, राज्य सरकारलाही या संदर्भात पत्र लिहिलं आहे.
‘महिला आयोगाचं अध्यक्षपद हे घटनात्मक पद आहे. या पदावरील असलेल्या व्यक्तीनं राजकीय पदावर राहू नये असा नियम आहे. चाकणकर यांची राजकीय पदावर झालेली नियुक्ती प्रथा-परंपरांना धरून नाही. यामुळं चुकीचा पायंडा पडू शकतो. उद्या राज्यपाल पदावरील व्यक्ती देखील राजकीय पक्षाचं पद घेऊ शकते. हा प्रकार घटनेचं उल्लंघन करणारा आहे. त्यामुळं चाकणकर यांच्याकडून महिला आयोगाचं अध्यक्षपद काढून घ्यावं, अशी विनंती तिवारी यांनी केली आहे. त्यामुळं चाकणकर यांना कुठलंही एक पद सोडावं लागणार आहे.