मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांना खातेवाटप करतील. यासाठी शिंदे भाजपच्या काही मंत्र्यांची खाती काढून ती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सोपवतील. विशेषतः या प्रकरणी शिंदे शिवसेनेच्या एकाही मंत्र्यांच्या खात्याला हात लावणार नाहीत. पण स्वतःची काही वाढीव खाती सोडून ते एनसीपीच्या नेत्यांना देतील, असे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत 40 आमदार आहेत. त्यातील 9 जण मंत्री झाले. त्यापैकी बहुतांश जणांकडे एकच खाते आहे. दुसरे खाते असले तरी ते कमी महत्त्वाचे आहे. याऊलट भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांकडे 2-3 मोठी खाती आहेत. खातेवाटपात यापैकी एखाद्या खात्यावर टाच येणार असल्याची शक्यता आहे.
अजित पवारांना ‘अर्थ’
भाजपच्या ज्या मंत्र्यांची खाती जाऊ शकतात त्यात स्वतः उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री शिंदेंकडे 13, तर फडणवीस यांच्याकडे 7 खात्यांचा प्रभार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे स्वतःकडे नगरविकास, सामान्य प्रशासन तथा माहिती व जनसंपर्क ही खाती कायम ठेवतील. तर फडणवीस यांच्याकडील अर्थ खाते अजित पवार यांना दिले जाईल. गृह खाते फडणवीस स्वतःकडे ठेवतील, असा अंदाज आहे.
प्रस्तावित खातेवाटपात अजित पवार यांना अर्थ खाते मिळाले तरी, त्यांना पूर्ण अर्थसंकल्प मांडता येणार नाही. कारण, पुढील वर्षीच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते अंतरिम अर्थसंकल्प मांडतील असा अंदाज आहे.
महाजनांचे 1, लोढांची 2 खाती जाणार?
गिरीश महाजन यांचे वैद्यकीय शिक्षण हे खाते आवडीचे आहे. खातेवाटपात ते त्यांच्याकडून जाऊ शकते. त्यांनी या खात्यासाठी आग्रह धरला, तर अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे ग्रामविकास खाते त्यांच्याकडून जाईल. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे महिला व बालकल्याण, पर्यटन व कौशल्य विकास ही 3 खाती आहेत. त्यातील एक किंवा दोन खात्यावर त्यांना पाणी सोडावे लागेल. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना महिला व बालकल्याण मंत्रालय सोडावे लागेल.
मुनगंटीवारांची खाती अबाधित राहणार
खातेवाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला रवींद्र चव्हाण यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खाते मिळण्याची शक्यता आहे. असे झाले तर चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते कायम राहील. चंद्रकांत पाटील यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कामकाज ही 3 खाती आहेत. त्यातील एक वा दोन जातील, असे सूत्रांनी सांगितले. या खातेवाटपात सुधीर मुनगंटीवार यांच्या खात्याला हात लावला जाणार नसल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.