• Tue. Apr 29th, 2025

शेळ्या मालकाविनाच घरी परतल्या, शोध घेताना रक्ताचा सडा दिसला…

Byjantaadmin

Jun 29, 2023

भंडारा: पवनी तालुक्यातील गुडेगाव येथे वाघाने पाच दिवसांमध्ये दोन बळी घेतले आहेत. यात गेल्या शुक्रवारी एका शेतकर्‍याला ठार केल्याची घटना ताजी असताना बुधवारी सकाळी त्याच वाघाने खातखेडा येथे आणखी एका शेतकऱ्यावर हल्ला करुन त्याला ठार केले. या घटनेनंतर संतप्त नकीबोललग जोपर्यंत वाघाचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, असा पवित्रा घेतला. इतकेच नाही तर त्यांची समजूत काढायला गेलेल्या सहाय्यक उपवनसंरक्षक यशवंत नागुलवार यांना संतप्त जमावाने मारहाण केल्याने ते जखमी झाले. या घटनेनंतर नांदीखेडा गावाकडे जाणाऱ्या गुरुदास उईके नावाच्या इसमावरही त्याच वाघाने हल्ला करून जखमी केले असल्याची माहिती समोर आली. त्याच्यावर सावरला आरोग्य उपकेंद्रात उपचार सुरू आहे. यानंतर संध्याकाळपर्यंत वनविभागाने वाघाला बेशुद्ध करुन जेरबंद केले.

Bhandara News Tiger

गेल्या शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भंडारा वनविभागाअंतर्गत येणाऱ्या पवनी वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र सावरला नियतक्षेत्र गुडेगाव येथील कक्ष क्रमांक २३८ या संरक्षित वनालगत शेतकरी सुधाकर सीताराम कांबळे, (वय अंदाजे 45 वर्ष, राहणार गुडेगाव) हे गुरांना चरण्यासाठी घेऊन गेले होते. ते शेताच्या बांधावर बसले असताना वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना ताजी असतानाच बुधवारी सकाळी वाघाने पुन्हा शेळ्या चरण्यासाठी नेलेल्या ईश्वर सोमा मोटघरे (वय ५८) रा.खातखेडा नामक शेतकऱ्याला आपले भक्ष्य बनविले. बुधवारी सकाळी १० च्या सुमारास ईश्वर मोटघरे हे शेळ्या चारण्यासाठी गेले होते. दरम्यान खातखेडा येथील बसस्थानकाजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करुन ठार केले. मालकाविनाच शेळ्या घरी परत आल्यामुळे ईश्वर यांचा शोध घेण्याकरिता कुटुंबातील व्यक्ती व गावकरी यांनी शेळ्या चारायला नेहमी जात असलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता अगदी रस्त्यापासून २० फुटावर रक्ताचा सडा, चप्पल व ईश्वर यांनी पावसापासून बचाव करण्यासाठी वापरलेली प्लास्टिक पिशवी पडलेली आढळली. रक्त पडलेल्या जागेपासून जंगलाचे आतमध्ये पाहणी केली असता जवळपास ८० फुटावर ईश्वर यांचा मृतदेह आढळून आला. बघता बघता हजारो गावकरी घटनास्थळी गोळा झाले. पाच दिवसातच दोन जणांचा जीव गेल्याने गावकरी संतप्त झाले आणि जोपर्यंत वाघाचा बंदोबस्त केला जात नाही तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला. या जमावाची समजूत काढण्यास गेले असता जमावाने भंडारा चे सहाय्यक वनसंरक्षक नागुलवार यांच्यावर हल्ला करीत त्यांना जखमी केले. जखमी अवस्थेत नागुलवार यांना पवनीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर नागपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले.

दुपारी उशिरा उपवनसंरक्षक राहुल गवई, तहसीलदार महेंद्र सोनुने, उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम यांच्या मध्यस्थीने गावकºयांनी मृतक ईश्वर याचा मृतदेह उचण्याकरीता मदत केली. मृतदेह ग्रामीण रुग्णालय पवनी येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी वन अधिकारी व कर्मचारी तसेच रॅपिड रिस्पॉन्स युनिट गोंदिया व भंडारा व पोलिस ताफा यांना घटनास्थळी पाचारण करण्यात घटनास्थळी दाखल झाला आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे आदेश पारित करण्यात आले आणि ड्रोन च्या मदतीने वाघाला शोधून त्याला जेरबंद करण्यात आले.

उपवनसंरक्षकांचे लेखी आश्वासन

गावालगतच्या जंगलातील झुडपे मजुरांचे साहाय्याने १५ दिवसात काढण्यात येतील, मृतकांच्या कुटुंबियास शासननिर्णयानुसार देय असलेले संपूर्ण लाभ एक महिन्याच्या आत देण्यात येतील. गावालगत असलेल्या तलावाला जाळीचे कुंपण करण्याचा प्रस्ताव जिल्हा वार्षिक योजना किंवा राज्य योजनेतून १५ दिवसात अंदाजपत्रक तयार करून सादर करण्यात येईल. सोलर कुंपण परिसरातील गावांना मिळण्याकरीता प्रस्ताव जिल्हा योजने अंतर्गत सादर करणार असल्याचे लेखी आश्वासन उपवनसंरक्षक राहूल गवई यांनी यावेळी दिले. मृतकाचे कुटूंबियांना तीस हजार रुपये रोख व ९ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला असून उर्वरित रक्कम लवकरच देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed