तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाचे दर्शन घेतले. सोमवारीच राज्य मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, आमदार, खासदार आणि पक्षाची विविध पदाधिकारी अशा 400 जणांचा ताफा घेत सहाशे वाहनांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव सोलापूर मुक्कामासाठी आले होते. मंगळवारी त्यांनी पांडुरंगाचे दर्शन घेत एका प्रकारे शक्ती प्रदर्शन केले आहे.
के चंद्रशेखर राव त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचा मोठा फौजफाटा सोबत घेऊन आलेले आहेत. हैदराबादमधून ते बसने महाराष्ट्र मध्ये दाखल झाले आहेत. सोलापूर येथील बालाजी हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला असून हॉटेल बाहेर त्यांच्या राज्यातून आलेल्या राज्य राखीव दलातील जवान पहारा देत आहेत.
सर्व मंत्र्यांचा व्हीआयपी प्रवेश
मंदिर विश्वस्त समितीने केवळ मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना गाभाऱ्यात प्रवेशाला परवानगी दिली होती. मात्र, बीआरएस पक्षाच्या वतीने हा शासकीय दौरा असल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर मंदिर समितीने सर्व मंत्रिमंडळाला गाभाऱ्यात प्रवेश घेऊन दर्शनाला परवानगी दिली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या सोबत आलेले प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांनी व्हीआयपी गेटने मंदिरात प्रवेश केला.
भगीरथ भालके यांच्या घरी भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे बीआरएस पक्षात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे भगीरथ भालके यांच्या घरी भेट देऊन देणार आहेत. भगीरथ भालके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणुकीतील उमेदवार होते. त्यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.