प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते अमोल पालेकर हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे देखील नेहमी चर्चेत असतात. प्रत्येक विषयावर ते आपली मतं मांडताना दिसतात. ता देखील त्यांनी असे एक वक्तव्य केले आहे, जे चर्चेत आले आहे. अमोल पालेकर यांनी कोल्हापुरात पार पडलेल्या शाहू सामाजिक सलोखा परिषदेला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी समाजात घडणाऱ्या वाईट घटनांवर भाष्य केलं. ‘पूर्वी गुंड लोकांना त्रास देत असायचे. मात्र, आता सरकार आणि राजकारणीच अशा मुखवटाधारी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाठिंबा देतात’, असे त्यांनी म्हटले आहे.यावेळी त्यांनी अनेक सामजिक घटनांवर देखील भाष्य केलं. अमोल पालेकर म्हणाले की, ‘गेल्या काही दशकांपासून अशाप्रकारे दहशत माजवण्याचं काम सुरू आहे. हुकुमशाही ही जमावाने एका व्यक्तीला पाठिंबा दिल्याचा परिणाम आहे. अशा अंध अनुयायांचा जमाव आपल्या आजूबाजूला आहेच. आपण त्यात वेढले गेलो आहोत. परंतु, आपणच त्यावर काही प्रतिक्रिया देत नाही आणि अनभिज्ञ राहतो.’
पुढे ते म्हणाले की, ‘लॉकडाऊनच्या काळात ज्यांनी थाळ्या वाजवल्या नाहीत, त्यांना समाजाने नक्षलवादी आणि देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न केला. भगवाकृत हिंदू भारत हे त्यांचे मुख्य ध्येय आहे. सोशल मीडिया हे अशा हिंसाचाराला बढावा देणारे एक प्रतीकात्मक ठिकाण आहे. याशिवाय ‘द केरळ स्टोरी’ आणि ‘द काश्मीर फाईल्स’सारखे प्रचारात्मक चित्रपट या देशात करमुक्त केले जातात.’या प्रसंगी बोलताना अमोल पालेकर म्हणाले की, ‘आज जर शाहू महाराज हयात असते तर, लैंगिक शोषणाचे आरोप असलेले खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून खेळाडूंना इतके दिवस आंदोलन करावे लागले नसते. महिलांवर अन्याय करणाऱ्या आणि असे गुन्हे करणाऱ्यांना तातडीने शिक्षा देण्याचे आदेश शाहू महाराजांनी दिले होते. ते नेहमीच सनातनी विचारधारेशी लढले.’