कॉक्सिटच्या रोपट्याचा २२ वर्षांत वटवृक्ष झाला ः विक्रम काळे
कॉक्सिटच्या वर्धापनदिनी तेराव्या अद्ययावत संगणक प्रयोगशाळेचे व सुधारीत संकेतस्थळाचे उद्घाटन
लातूर, दि.३- भाड्याच्या इमारतीत सुरू केलेले कॉक्सिट महाविद्यालय आज स्वतःच्या जागेत दिमाखात उभे आहे. मागील बावीस वर्षांत कॉक्सिटने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर संगणक क्षेत्रात मराठवाड्यात अग्रगण्य महाविद्यालय म्हणून नावलौकिक केले आहे. नोकर्या देणारे महाविद्यालय म्हणून कॉक्सिटची ख्याती आहे, असे प्रतिपादन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी येथे केले.
येथील कॉक्सिट महाविद्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या अद्ययावत संगणक प्रयोग शाळेचे व महाविद्यालयाच्या सुधारीत संकेतस्थळाचे उद्घाटन काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील होते. यावेळी कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे प्रा. अंकुश नाडे, कॉक्सिट ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. बी. एल. गायकवाड, कॉक्सिटचे उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपप्राचार्य डी. आर. सोमवंशी, प्रा. नितीन वाघमारे, क्रीडा संचालक प्रा. बाळकृष्ण देवडे, डॉ. डी. एच. महामुनी, ट्रेनिंग व प्लेसमेंट प्रमुख प्रा. कैलास जाधव, प्रा. सुषमा मुंडे, अधीक्षक प्रदीप कावळे उपस्थित होते.
विक्रम काळे म्हणाले, मागील बावीस वर्षांपूर्वी भाड्याच्या इमारतीत डॉ. एम. आर. पाटील यांनी कॉक्सिट महाविद्यालयाची स्थापना केली. संगणकशास्त्रासारख्या नवख्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी धाडसाने पाउल ठेवले. सुरुवातीच्या काळात अनंत अडचणींवर मात करून या रोपट्याचे आज वट वृक्षात रुपांतर केले आहे. डॉ. एम. आर. पाटील यांच्या धडपडीला सर्व कर्मचार्यांनी तेवढीच साथ दिल्याने कॉक्सिटचे नाव आज मराठवाडाच नव्हे तर देशभरातील आयटी क्षेत्रात अभिमानाने घेतले जात आहे. विद्यार्थ्यांना नोकर्या मिळाव्यात, यासाठी आंतरराष्ट्रीय आयटी कंपन्यांना महाविद्यालयात बोलाऊन कॅम्पस मुलाखती घेऊन महाविद्यालयातच नोकर्या उपलब्ध करून देण्याचे काम कॉक्सिट करीत आहे. यामुळे नोकर्या देणारे महाविद्यालय अशी संपूर्ण मराठवाड्यात ओळख या महाविद्यालयाची झाली आहे. डॉ. पाटील यांच्या मेहनतीला सर्वांनी साथ देऊन महाविद्यालयाचा नावलौकिक आणखी वाढवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. एम. आर. पाटील म्हणाले, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना नोकर्या मिळणारे शिक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी विविध नामांकित आयटी कंपन्यांनी प्रशिक्षण दिलेले तज्ज्ञ प्राध्यापक या महाविद्यालयात आहेत. कंपन्यांमध्ये काम करताना आवश्यक असलेले प्रशिक्षण आपल्या महाविद्यालयात देण्यात येते. यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू असतानाच नोकर्या मिळत आहेत. यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहेत. मर्यादित प्रवेश असल्याने अनेक विद्यार्थी संगणकशास्त्राच्या शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे आवश्यक त्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आपण मंत्रालयात पाठपुरावा करावा, असे आवाहन डॉ. एम. आर. पाटील यांनी आमदार विक्रम काळे यांना केले.
कॉक्सिटच्या रोपट्याचा २२ वर्षांत वटवृक्ष झाला-आमदार विक्रम काळे
