सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्या. पी. एस. नरसिम्हा आणि न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर याबाबतची सुनावणी पार पडली. आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले की, भारतीय गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास 10 लाख कोटींचे नुकसान झाले असल्याचे म्हटले जाते. भविष्यात असे होणार नाही, याची खात्री आम्ही कशी करावी, सेबीची भूमिका काय असणार,असे सरन्यायाधीशांनी म्हटले.

याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. विशाल तिवारी यांनी खंडपीठासमोर एक चौकशी समिती नेमण्याची मागणी केली. त्यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आपण सेबीची बाजू मांडणार असल्याचे म्हटले. कोर्ट जे प्रश्न उपस्थित करणार, त्याला मी उत्तर देणार असल्याचे सांगितले. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सेबीच्यावतीने बाजू मांडतांना म्हटले की, या प्रकरणाचा ट्रिगर पॉईंट हा भारताच्या बाहेर होता. त्यावर सरन्यायाधीशांनी विचारले की, तुम्ही गुंतवणूकदारांचे संरक्षण कसे करणार आहात, आता प्रत्येकजण गुंतवणूकदार आहेत. त्यावर सॉलिसिटर जनरल यांनी म्हटले की, आता थेट उत्तर देणे थोडे घाईचे होईल. मात्र, या प्रकरणाचा ट्रिगर पॉईंट देशाबाहेर होता, असे त्यांनी सांगितले.