मध्यपूर्वेतील तुर्किये (जुने नाव तुर्की), सीरिया, लेबनॉन व इस्रायल हे 4 देश सोमवारी सकाळी भूकंपाने हादरले. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या तुर्किये व त्याच्या लगतच्या सीरियात या भूकंपामुळे सर्वाधिक विध्वंस झाला. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या भूकंपामुळे तुर्कियेत 1014 जणांचा मृत्यू, तर 5,385 जण जखमी झालेत.
तुर्किश मीडियाच्या वृत्तानुसार, भूकंपाचे 2 मोठे धक्के जाणवले. पहिला धक्का स्थानिक प्रमाणवेळेनुसार, पहाटे 4 वा. (7.7) व दुसरा सकाळी 10 च्या सुमारास आला. दुसऱ्या धक्क्याची तीव्रता 7.6 नोंदवण्यात आली. याशिवाय 78 आफ्टर शॉक्स नोंदवण्यात आले. त्यांची तीव्रता 6.7 ते 6.5 होती.
या भूकंपामुळे सीरियातही 585 जण ठार, तर 1500 हून अधिक जण जखमी झालेत. दोन्ही देशांतील बळींचा आकडा 1600 वर पोहोचल्याचा दावा केला जात आहे. लेबनान व इस्त्रायलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. पण सुदैवाने तिथे कोणतेही नुकसान झाले नाही.
भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कियेचे गझियानटेप शहर
भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कियेमधील गझियानटेप शहर होते. हे सीरिया सीमेपासून 90 किमी दूर आहे. त्यामुळे त्याच्या आजूबाजूच्या भागात अधिक विध्वंस झाला. त्याचा परिणामही दिसून येत आहे. दमास्कस, अलेप्पो, हमा, लताकियासह अनेक शहरांमध्ये इमारती कोसळल्याचं वृत्त आहे.
पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली
दुसरीकडे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कियेतील भूकंपात प्राण गमावणाऱ्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले -140 कोटी भारतीयांच्या भावना तुर्कियेसोबत आहेत. भारत सरकार मदतीसाठी मदत सामग्रीसह NDRF व वैद्यकीय बचाव पथक तुर्कियेला पाठवत आहे.
18 आफ्टरशॉक आले, 7 तीव्रतेचे 5 पेक्षा जास्त
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, 7.8 तीव्रतेच्या भूकंपानंतर 18 आफ्टरशॉक नोंदवले गेले. त्यांची तीव्रता 4 पेक्षा जास्त होती. पहिल्या भूकंपानंतर झालेल्या 7 मोठ्या भूकंपांच्या धक्क्यांची तीव्रता 5 पेक्षा जास्त होती. पुढील काही तास आणि दिवस आफ्टरशॉक जाणवतील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
