10 वी आणि 12 वी परीक्षेबाबत मंडळाकडून महत्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. यंदा दहावी बारावीच्या परीक्षेचे नियम कडक करण्यात आले आहेत. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, प्रश्नपत्रिका मिळविणे, विकणे आणि विकत घेतल्यास किंवा मोबाईल अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केल्यास परीक्षार्थी विद्यार्थ्याची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यास पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध (Rusticate) करण्यात येणार आहे. शिवाय परीक्षार्थ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान, तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. मात्र गेल्या दोन वर्षात झालेल्या परीक्षांच्या अनेक नियमात यंदा बदल करण्यात आला आहे. सोबतच कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी काही कठोर नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे. मागील दोन वर्षात कोरोनाची परिस्थिती पाहता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी काही बदल करत सूट देण्यात आली होती. मात्र आता या नियमात मंडळाने बदल करून पूर्वीप्रमाणे परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
काय बदल करण्यात आले?
- शाळा तेथे केंद्र (होम सेंटर) पद्धत बंद करण्यात आली आहे
- 25 टक्के कमी अभ्यासक्रम रद्द करून 100 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे.
- उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी अर्धा तास अधिकचा वेळ देखील रद्द करण्यात आला आहे.
- परीक्षेत यंदा बैठेपथक विशिष्ट शाळेत पूर्णवेळ हजर राहणार आहे.
दहावी – बारावीच्या परीक्षेबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घालून देण्यात आलेल्या नियमांचं विद्यार्थ्यांना पालन करावे लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते, एवढेच नाही तर पाच वर्षांसाठी विद्यार्थ्यांच्या परीक्षा देण्यावर बंदी घालण्यात येऊ शकते.
खालील नियमांचे उल्लंघन केल्यास करण्यात येणार कारवाई
- मंडळाच्या अधिकृत उत्तरपत्रिका, पुरवण्या, आलेख, नकाशे, लॉग टेबल, अनधिकृतपणे मिळवणे आणि वापर केल्यास पुढील एका परीक्षेस प्रतिबंध करण्यात येणार आहे
- परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, मिळविणे, विकणे व विकत घेणे तसेच भ्रमणध्वनी व अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केली तर पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध करण्यात येणार आहे
- परीक्षार्थ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होणार
- मंडळाने मान्यता न दिलेली अथवा प्रतिबंध केलेली साधने, साहित्य परीक्षा दालनात स्वत:जवळ बाळगणे वापरणे.
- उत्तरपत्रिकेत-पुरवणीत प्रक्षोभक,अर्वाच्य भाषेचा वापर, शिवीगाळ लिहिणे किंवा धमक्या देणे, बैठक क्रमांक,फोन नंबर ,भ्रमणध्वनी क्रमांक देऊन संपर्क साधण्यास विनंती करणे. विषयाशी संबधित नसलेला अन्य मजकूर लिहिणे
- परीक्षा सुरू असताना इतर परीक्षार्थ्यांबरोबर उत्तराच्या संदर्भात गैरहेतूने संपर्क साधणे,एकमेकांचे पाहून लिहिणे, अन्य परीक्षार्थ्यांस तोंडी उत्तरे सांगणे.त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा चुकीच्या मार्गाने परीक्षा देण्याचा प्रयत्न केल्यास पुढील पाच वर्ष परीक्षेसाठी मुकावे लागणार आहे.