• Wed. Apr 30th, 2025

चिन्ह मिळालं, पण शिंदेंची कोंडी, भाजप साधणार संधी?

Byjantaadmin

Feb 24, 2024

मुंबई: लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने राहिले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा पेच कायम आहे. राज्यातील सरकारमध्ये तीन पक्ष असल्यानं जागावाटपाचा तिढा कायम आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जागावाटपाबद्दल चर्चा केली. भाजप आणि शिंदेंच्या सरकारमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सामील झाल्यानं जागावाटप आव्हानात्मक असेल.जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री शिंदेंना एक महत्त्वाचा प्रस्ताव दिल्याचं वृत्त आहे. नड्डा यांनी शिंदेंशी यांच्याशी तासभर चर्चा केली. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि लोकसभा निवडणुकीसाठीचं जागावाटप हे चर्चेतले महत्त्वाचे मुद्दे होते. ज्या मतदारसंघांमध्ये संभ्रम असेल तिथे महायुतीचे उमेदवार कमळ चिन्हावर लढतील, असा प्रस्ताव नड्डांनी शिंदेंना दिला आहे. यामुळे उमेदवाराच्या विजयाची शक्यता वाढेल आणि महायुती अधिक जागा जिंकू शकेल, असं नड्डांकडून शिंदेंना सांगण्यात आलं आहे. शिंदेंनी नड्डा यांच्या प्रस्तावावर अद्याप तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही. या प्रस्तावावर येत्या काही दिवसांत आणखी चर्चा होऊ शकते. ईटीव्ही भारतनं सुत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

राज्यात लोकसभेचे ४८ मतदारसंघ आहेत. गेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. त्यावेळी एकसंध असलेल्या शिवसेनेनं २३ जागा लढवल्या आणि १८ जिंकल्या. तर भाजपनं २५ जागा लढवत २३ जागांवर यश मिळवलं. शिवसेनेत फूट पडल्यानंतर १८ पैकी १३ खासदार शिंदेंसोबत गेले. तर ५ खासदार ठाकरेंसोबत राहिले. गेल्या वर्षी अजित पवारांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यांच्यासोबत केवळ १ खासदार आहे. महायुतीत अजित पवारांची एंट्री झाल्यानं जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे.भाजप नेतृत्त्व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४, शिंदेंच्या शिवसेनेला १२ जागा देईल. उर्वरित ३२ जागांवर भाजप लढेल अशी चर्चा आहे. यावरुन शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी नाराजी व्यक्त केली. आमच्यासोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. आम्ही गेल्या निवडणुकीत २३ जागा लढवल्या. त्यातल्या १८ जिंकल्या. मग यावेळी आम्ही १२ जागा का घ्यायच्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शिंदेंची कोंडी, भाजप साधणार संधी?
सध्या लोकसभेचे १३ खासदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. निवडणूक आयोगाचा निकाल त्यांच्या बाजूनं लागला आहे. पक्ष आणि चिन्ह त्यांना मिळालं आहे. अशा परिस्थितीत त्यांचे उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर लढल्यास त्याचा फटका शिंदेंना बसेल. त्यांच्या खासदारांची संख्या कमी होईल. त्यामुळे भविष्यात त्यांचं बळ घटेल. शिवसेनेत फूट पाडली, पक्ष, चिन्ह मिळवलं आणि निवडणुकीत उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढवले, असा संदेश मतदारांमध्ये गेल्यास तो शिंदेंना महागात पडेल. तर दुसरीकडे भाजपला यामुळे फायदा होईल. राज्यातील त्यांची खासदारांची संख्या वाढेल. त्यामुळे भविष्यात त्यांना शिंदेंची तितकीशी गरज भासणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed