मुस्लिम धर्मीयांसाठी हज यात्रा महत्त्वाची का आहे? हज यात्रा म्हणजे काय?
सौदी अरेबियातील मक्का येथे वार्षिक हज यात्रेला सुरुवात झाली आहे. पवित्र काबाचे दर्शन घेण्यासाठी मक्का मशिदीच्या दिशेने हजारो मुस्लिम चालू लागल्याचे दृश्य सध्या सौदीत दिसत आहे. जगभरातील १६० देशांमधून दोन दशलक्ष यात्रेकरू दरवर्षी हज यात्रा करण्यासाठी मक्का येथे जात असतात. जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव मानल्या जाणाऱ्या हज यात्रेला करोना निर्बंध हटल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या जोमाने सुरुवात झाली आहे. इस्लाम धर्माच्या पाच तत्त्वांपैकी हज यात्रा एक तत्व आहे. शारीरिक आणि आर्थिकरित्या सक्षम असणाऱ्या मुस्लिमांनी आयुष्यात एकदा तरी हज यात्रा केली पाहिजे, असे सांगितले जाते. जीवनात कळत-नकळत झालेले पाप धुवून टाकणारा आणि अल्लाहच्या नजीक नेणारा एक अध्यात्मिक अनुभव म्हणून हज यात्रेकडे पाहिले जाते. मुस्लीम धर्मीयांच्या एकतेचे प्रतीक म्हणूनही याकडे पाहिले जाते.
१९२० साली सौदी अरेबियाच्या शाही परिवाराने मक्का स्वतःच्या ताब्यात घेतले. सौदीतील यंत्रणांनी अब्जावधी रुपये खर्च करून इथे आधुनिक सोयी-सुविधा उभारल्या आहेत. मात्र २०१५ मध्ये यात्रेदरम्यान मोठी शोकांतिका घडली. चेंगराचेंगरीमुळे जवळपास २,४०० यात्रेकरूंना आपला जीव गमवावा लागला होता. सोमवार (दि. २६ जून) पासून सुरू झालेल्या हज यात्रेबद्दल आणि इस्लाममधील त्याच्या महत्त्वाबद्दल जाणून घेऊयात.
हज यात्रा कधी होते?
‘धू-अल-हिज्जा’ (Dhu al-Hijjah) इस्लामिक दिनदर्शिकेच्या या शेवटच्या महिन्यात हज यात्रा प्रारंभ होते. ग्रेगोरियन दिनदर्शिकेच्या तुलनेत इस्लामिक दिनदर्शिकेत ११ दिवस कमी येतात. त्यामुळे ग्रेगोरियन दिनदर्शिकेत दरवर्षी हजच्या तारखा वेगवेगळ्या असतात. मागच्यावर्षी पेक्षा पुढील वर्षात हज १० ते ११ दिवसांनी आधीच येतो. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार दर ३३ वर्षांनी एका वर्षात दोन वेळा हजच्या तारखा येतात. असा योगायोग २००६ साली घडलेला आहे. यावर्षी हजच्या तारखा २६ जून ते १ जुलैपर्यंत आल्या आहेत.
इस्लामधील हज यात्रेचा इतिहास काय आहे?
हज यात्रा जगभरातील मुस्लीमांना मक्का येथे आकर्षित करत असते. जिथे ते प्रेषित मोहम्मद यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रेषित इब्राहिम आणि इस्लाईल यांनी केलेला प्रवास हज यात्री करतात. (ख्रिश्चन आणि ज्यू धर्मात यांची नावे अनुक्रमे अब्राहम आणि इश्माएल आहेत.) अल्लाहने आदेश दिल्याप्रमाणे इब्राहिम याने मक्का येथे देवासाठी घर तयार केले. (सध्या मक्का येथे असलेले काबा हे ते ठिकाण असल्याचे मानले जाते) इब्राहिमने याठिकाणी तीर्थयात्रेची परंपरा सुरू केली. इब्राहिमनंतर त्याचा मुलगा इस्माईल आणि या भागात राहणाऱ्या विविध जमातींनी ही परंपरा पुढे नेली. जशी शतके पुढे गेली, तसे इब्राहिम यांनी दाखविलेला एकेश्वरवाद हळूहळू क्षीण होत गेला आणि काबामध्ये मूर्तिपूजेने शिरकाव केला.
कालांतराने प्रेषित मोहम्मद यांचा जन्म (अंदाजे इसवी सन ५७०) झाल्यानंतर जुनी पद्धत मागे पडली. इसवी सन ६३० मध्ये प्रेषित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मक्का जिंकण्यात यश मिळवले. काबामधील सर्व मूर्त्या नष्ट करून त्याची पुर्नस्थापना केली. इसवी सन ६३२, जेव्हा प्रेषित मोहम्मद यांचे देहावसन झाले, त्यावर्षी त्यांनी काबाची सर्वात पहिली तीर्थयात्रा पूर्ण केली. प्रेषित मोहम्मद यांची निरोप तीर्थयात्रा म्हणून याची ओळख आहे. याच यात्रेत हजचे नियम आणि संस्कार ठरविले गेले, जे आजतागायत मुस्लिम भाविकांकडून पाळण्यात येतात.
काळा रंग आणि सोन्याचे भरतकाम करून कापडाने झाकलेल्या चौकोनी आकाराच्या काबा या वास्तूला मुस्लीम धर्मात मोठे पवित्र स्थान आहे. एकेश्वरवाद आणि एकतेचे ते शक्तीशाली प्रतीक असल्याचे मानले जाते. जगात मुस्लीम कुठेही असले तरी ते काबाच्या दिशेने तोंड करून रोजचा नमाज पठण करत असतात. प्रेषितच्या काळापासून दरवर्षी हज यात्रा संपन्न होत आहे. आजवर युद्ध, प्लेग आणि इतर कोणतेही अडथळे आले तरी हज यात्रा दरवर्षी होते.
मध्ययुगात हज यात्रा करणे फार कठीण काम होते. कैरो, दमास्कस आणि इतर शहरांमधून मोठमोठ्या सशस्त्र तांड्यासह हज यात्रेचे आयोजन केले जात असे. वाळवंटातून केला जाणारा हा एक कठीण प्रवास होतो. वाटेत बेडूइन जमातीकडून तांड्यावर हल्ले केले जायचे आणि खंडणीची मागणी केली जात असे. १७५७ साली बेडूइन जमातीच्या लोकांनी संपूर्ण हज तांडा नष्ट करत हजारो यात्रेकरूंची हत्या केली होती. २०२० साली जगभरात आलेल्या करोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे सौदी अरेबियाने हज यात्रेवर बंधने आणली होती. देशातील काही हजार नागरिक आणि स्थानिकांनाच मक्कात येण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर यावर्षी पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने हज यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
हजसाठी मुस्लिम नागरिक कशाप्रकारे तयारी करतात?
काही यात्रेकरू हजला जाण्यासाठी आयुष्यभर पैशांची बचत करत असतात किंवा परमिट मिळण्यासाठी अनेक वर्षांची वाट पाहत असतात. सौदी अरेबियाकडून प्रत्येक देशाला कोटा निश्चित करून देण्यात आला आहे. त्या त्या देशातून तेवढ्याच संख्येने यात्रेकरू पाठविण्यात येतात. ट्रॅव्हल एजंटकडूनही विविध उत्पन्न गटासाठी हज पॅकेज विकण्यात येते. तसेच धर्मदाय संस्थांकडून गरजू यात्रेकरूंना मदत देण्यात येते.
हज यात्रेकरून सौदीतील इहराम या पवित्र राज्यातून यात्रेची सुरुवात करावी लागते. स्त्रिया केस झाकून तर पुरुष पांढऱ्या शुभ्र रंगाचे वस्त्र अंगभर परिधान करून यात्रेसाठी चालू लागतात. या पांढऱ्या वस्त्राला कोणत्याही प्रकारची शिलाई केलेली नसावी, असे नियम गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वांनाच घालून देण्यात आले आहेत. यात्रेदरम्यान यात्रेकरूंना केस कापण्यास मनाई केलेली आहे. तसेच इहराममध्ये असताना नखे कापणे किंवा शारीरिक संबंध प्रस्थापित करणे प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. यात्रेदरम्यान कुणाशीही ओरडून बोलण्यास किंवा भांडण करण्यास मनाई असते. उष्णता, गर्दी आणि प्रवासातील विविध अडथळ्यांचे टप्पे पार करत असताना व्यक्तिच्या संयमाची परिक्षा यातून घेतली जाते.
मक्काच्या दिशेने जात असताना अनेक मुस्लीम यात्रेकरू मदिनाला भेट देतात. याठिकाणी प्रेषित मोहम्मद यांना दफन करण्यात आले होते, तसेच याच ठिकाणी त्यांनी पहिली मशीद बांधली होती.
हज दरम्यान काय होते?
पहिल्या दिवशी यात्रेकरू मक्कामधील काबा वास्तूला घडाळ्याच्या काट्यानुसार सात वेळा प्रदक्षिणा करून हज सुरू करतात. या क्रियेला तवफ (Tawaf) असे म्हटले जाते. प्रदक्षिणा करत असताना भाविक नमाजचे पठण करतात. त्यानंतर इस्लामिक परंपरेनुसार हागरने (प्रेषित इब्राहिम यांची पत्नी) ज्याठिकाणी तिचा मुलगा इस्लाईलसाठी पाण्याचा शोध घेतला, त्या दोन टेकड्यांवर यात्रेकरू चढतात आणि त्या ऐतिहासिक प्रसंगाची उजळणी करतात. काबा आणि सफा आणि मारवा नावाच्या दोन टेकड्या मक्का या मशिदीच्या आत आहेत. ही कथा इस्लाम, ख्रिश्चन आणि ज्यू परंपरेमध्ये विविध प्रकारे सांगण्यात आलेली आहे.
दुसऱ्या दिवशी मक्का मशिदीच्या पुर्वेकडे २० किमी अंतरावर असलेल्या माऊंट अराफतच्या दिशेने यात्रेकरू निघतात. याठिकाणी प्रेषित मोहम्मद यांनी शेवटचे प्रवचन दिले होते. या स्थानाला दयेचा पर्वत (Mountain of Mercy) असेही म्हटले जाते. येथे यात्रेकरू दिवसभर उभे राहून प्रार्थना करतात आणि आपल्या पापांची क्षमा मागतात. अनेकांच्या मते हज यात्रेतील हा सर्वोच्च क्षण आहे. सुर्यास्त होण्याच्या वेळेस यात्रेकरू याठिकाणाहून निघून अराफतच्या पश्चिमकडे नऊ किमी अंतरावर असलेल्या मुजदलिफा याठिकाणी जातात. मुजदलिफा येथे रात्र काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी छोटे दगड वेचण्याचा विधी पार पाडला जातो. ज्याला जमराह (Jamarah) असे म्हटले जाते.
इस्लाम धर्माच्या मान्यतेनुसार मिना याठिकाणी इब्राहिमला अल्लाहची आज्ञा नाकारून मुलाला वाचविण्याचा मोह झाला होता. हा मोह दुष्ट आत्म्यामुळे झाला होता, अशी मान्यता असल्यामुळे यात्रेकरूंनी वेचलेले दगड दुष्ट आत्म्यावर फेकण्याची प्रतिकात्मक परंपरा आजवर जोपासण्यात आली आहे. तसेच मिना या ठिकाणी यात्रेकरू तंबूत अनेक रात्री घालवितात. हा जगातील सर्वात मोठा कॅम्प असल्याचे म्हटले जाते. मिना येथे एक लाख वातानुकूलित तंबू आहेत. ज्यामध्ये एकावेळेस तीन लाख यात्रेकरू राहण्याची सोय करण्यात आली आहे. पुढे काबाची अंतिम प्रदक्षिणा करून आणि मिना येथे दगडफेक करून यात्रेची समाप्ती होते. यात्रेच्या समाप्तीवेळी नाविन्याची अनुभूती म्हणून पुरूष डोके भादरतात.
हजचे शेवटचे दिवस ईद-उल-अधा किंवा बकरी ईदच्या बरोबरीने येतात. जगभरातील मुस्लिम नागरीक इब्राहिमच्या अल्लाहवरील विश्वासाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा करतात. या सणाच्या निमित्ताने बकऱ्याचा बळी देऊन त्याचे मांस गरीबांमध्ये वाटण्याची प्रथा काही लोक पाळतात. हज यात्रा केल्यानंतर अनेकांना हज किंवा हज्जा हे उपनाव देऊन सन्मानाने त्यांचा उल्लेख केला जातो. काही यात्री त्यांच्या घरावर विमान, जहाज आणि काबाचे चित्र रंगवून आपल्या प्रवासाची आठवण कायमची स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न करतात.
सौदी अरेबियासाठी हजचे महत्त्व काय आहे?
हज यात्रा आयोजित करणे हे सौदी अरेबियासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. मध्य पूर्व भौगोलिक राजकारणाचे तज्ज्ञ कामरान बुखारी यांनी २०१७ साली केलेल्या लिखाणानुसार, मक्का आणि मदिना या पवित्र स्थळांचे प्रशासकीय अधिकार आणि हज यात्रेवर नियंत्रण असल्यामुळे रियाधमधील (सौदी अरेबियाची राजधानी) राजेशाहीला वैधता प्राप्त होते.
त्याशिवाय हज यात्रा सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेमध्येही मोठे योगदान देते. तेलाच्या निर्यातीनंतर यात्रेकरूंच्या माध्यमातून दरवर्षी सौदी अरेबिया अब्जावधींचा महसूल मिळतो. २०२२ साली हजशी निगडित असलेला महसूल १५० अब्जांच्या पलीकडे गेला होता.