• Wed. Apr 30th, 2025

यंदाचा नौसेना दिन शिवछत्रपतींच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा होणार, राष्ट्रपती आणि पंतप्रधान उपस्थित राहणार

Byjantaadmin

Apr 27, 2023

सिंधुदुर्ग : मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक आणि अभेद्य अशा सिंधुदुर्ग किल्ल्यावर (Sindhudurg Fort) यावर्षीचा भारतीय नौसेना दिन साजरा होणार आहे. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस भारतीय नौसेना दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने सिंधुदुर्गात 70 लढाऊ जहाजे सहभागी होणार आहेत.

यंदाच्या नौसेना दिनानिमित्त भारतीय नौसेनेच्या सामर्थ्याचे मोठे शक्तिप्रदर्शन सिंधुदुर्गच्या समुद्रात होणार आहे. जगात चौथ्या क्रमांकाची बलाढ्य नौसेना म्हणून भारतीय नौसेनेला जगात ओळखले जाते. 1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यान भारतीय नौसेनेने पाकिस्तानच्या कराची बंदरावर जो वज्राघात केला होता, त्यामुळे पाकिस्तानला सपशेल शरणागती पत्करावी लागली होती. या वज्राघाताने भारतीय नौसेनेची खरी ताकद साऱ्या जगाला कळून चुकली आणि त्यामुळेच दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस भारतीय नौसेना विजय दिवस म्हणून साजरा केला जातो

त्यावेळी एक कोटी होन खर्च

शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक असं म्हटलं जातं. समुद्रावर ज्याचं वर्चस्व त्याचं जगावर वर्चस्व हे सूत्र शिवरायांनी सर्वप्रथम ओळखलं. ब्रिटिश व्यापाऱ्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सागरी किल्ल्यांची गरज असल्याचं शिवरायांनी जाणलं आणि अनेक जलदुर्गांची निर्मिती केली. त्यामध्ये सिंधुदुर्ग हा किल्ल्याचा सर्वात वरचा क्रमांक लागतोय.

डोंगरी किल्यांच्या बरोबरीने अरबी समुद्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जलदुर्गांचे महत्त्व आहे हे सर्वप्रथम शिवाजी महाराजांनी ओळखलं. त्यानंतर शिवरायांनी सागरी किल्ल्यांची निर्मिती सुरू केली. स्वराज्यातील एक महत्त्वाचा सागरी किल्ला असलेला सिंधुदुर्ग हा त्यापैकीच एक. या किल्ल्याच्या निर्मितीसाठी शिवरायांनी मालवण जवळील कुरटे नावाचे काळा कभिन्न खडक असलेले बेट निवडले. 25 नोव्हेंबर 1664 रोजी शिवरायांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी केली. शिवरायांच्या हस्ते ही पायाभरणी करण्यात आली. या किल्ल्याच्या पायाभरणीसाठी 500 खंडी शिशाचा वापर करण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

असं म्हटलं जातं की हा किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. या किल्ल्याच्या उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला किल्ला अशी ओळख असलेला सिंधुदुर्ग जवळपास साडेतीनशे वर्षे समुद्राच्या लाटा झेलत उभा आहे. या किल्ल्याचे क्षेत्र सुमारे 48 एकर आहे आणि त्यांचा तट दोन मैल इतका आहे. या तटाची उंची 30 फूट तर रूंदी 12 फूट आहे. या किल्ल्याच्या तटास ठिकठिकाणी भक्कम असे 22 बुरुज आहेत. सिंधुदुर्ग या किल्ल्यावर शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या पायाचे ठसे उमटलेले आहेत. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर इ.स. 1695 साली शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed