विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून ऊस तोडणी यंत्राद्वारे मोठ्या प्रमाणात ऊसाची तोडणी
दैनंदिन ऊस तोडीत 75 टक्के मशीनचा वापर होत असल्याने हे कार्य दिशादर्शक
लातूर :-राज्यातील साखर उद्योगात विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत असुन देशपातळीवर व राज्यातील सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख कारखान्याने निर्माण केली आहे. त्याच परंपरेला कायम ठेवत मांजरा कारखान्यात २०२२-२०२३ या चालू गळीत हंगामात होत असलेली ऊसाची तोड ही दररोज 75 टक्के म्हणजेच दैनंदिन जवळपास ४००० मॅट्रिक टनाचा ऊस हा ऊस तोडणी यंत्राद्वारे केला जात आहे.यांत्रिकीकरणाचा योग्य वापर करत दैनंदिन गाळपात गती घेतल्याने व्यवस्थापन अधिकारी,कर्मचारी व कामगार यांचे सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब, माजी मंत्री आ.अमित विलासरावजी देशमुख साहेब, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासरावजी देशमुख साहेब व संचालक मंडळाने कौतुक केले आहे.
*उसाची तोडणी यंत्राद्वारे सुरु*
काळाची गरज ओळखून मांजरा कारखान्याने यांत्रिकीकरणाचा केलेला स्विकार हे कार्य कौतुकास्पद व दिशादर्शक ठरत आहे.
ऊसतोड मजुरां अभावी ऊस तोडी संदर्भात येत असलेल्या अडचणी,शेतकरी व कारखान्याची होणारी आर्थिक अडचण व त्यातून होत असलेला त्रास यामुळे ऊस तोडणी यंत्राद्वारे ऊसतोड व्हावी अशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब,कारखान्याचे संचालक तथा माजी मंत्री तथा आमदार अमित विलासरावजी देशमुख साहेब,लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासरावजी देशमुख साहेब यांनी धोरणात्मक निर्णय घेत ऊस तोडणीयंत्र खरेदी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले असून त्यानुसार लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने तत्परतेने ऊसतोडणी यंत्रासाठी कर्ज मंजूर करून दिले. या कर्जास मांजरा परिवारातील कारखान्याने हमी दिल्याने संबंधित शेतक-याना आधार मिळाला. मांजरा साखर कारखान्याकडील मागच्या वर्षीचे १३ व चालू वर्षातील ३० असे एकूण ४३ ऊस तोडणी यंत्राद्वारे मोठ्या प्रमाणात दैनंदिन ऊसतोड होत आहे.ऊस तोडणी यंत्राद्वारे तोड होऊन आलेला ऊस गव्हाणीत टाकण्यासाठी विशेष अशी गव्हाण व्यवस्थापन समिती केली असून यासाठी दोन कृषी पर्यवेक्षक व एक कृषी मदतनीस असे नऊ जणांची नियुक्ती त्यात केली आहे. हायड्रोलिक ट्रेलरने सरळ गव्हाणीत ऊस टाकला जात असल्याने वेळेची बचत होऊन अविरतपणे मांजरा साखर कारखान्यात दैनंदिन गाळप सुरू आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या विकासाला लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांनी नेहमीच प्राधान्य दिले म्हणूनच आपल्या हक्काचा कारखाना हा विश्वास शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला. काळानुसार साखर उद्योगात होत असलेल्या बदलांचा स्वीकार करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब मांजरा कारखान्याने नेहमीच केला आहे. केवळ साखर निर्माण करून न थांबता सहवीज निर्मिती,डीस्टलरी प्रकल्प,थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती,ऑक्सीजन प्रकल्पाची उभारणी व आता ऊस तोडणी यंत्राचा वापर याद्वारे शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे काम मांजरा कारखान्या कडून अविरतपणे होत आहे. कारखान्याने १ नवीन ऑक्झिलरी कॅरिअर बसवण्याचे प्रस्तावित केले असून ते सुरू झाल्यानंतर हार्वेस्टर ऊसाचे गाळपास अधिक गती येवून सुलभता येणार आहे.अशी माहिती कारखान्याचे व्हा.चेअरमन श्रीशैल उटगे,कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी दिली आहे.
उसाचे तोडणी ७५ टक्के यंत्राद्वारे
यंत्राद्वारे ऊस तोडणी बाबत मतमतांतरे असताना मांजरा कारखान्याने मात्र ७५ टक्के यंत्राचा ऊस गाळप करून हा प्रयोग यशस्वी ठरविला आहे.
ऊस तोडणी यंत्र व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी कारखान्यात होत असल्यामुळे चालू गळीत हंगाम देखील मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल असा विश्वास संचालक मंडळास आहे.