पेट्रोलियम निर्यात करणारी देशांची संघटना ओपेक प्लसने मंगळवारी ३ एप्रिल रोजी संयुक्तपणे १० लाख बॅरल तेल उत्पादनात कपात करण्याची घोषणा केली आहे. ओपेक देशांपाठोपाठ रशियासुद्धा ५ लाख बॅरल कपात करणार असल्याचं सांगितलं जातंय. अशा परिस्थितीत ओपेक आणि आता रशिया या दोघांच्या तेल कपातीच्या घोषणेमुळे महागाईनं जग होरपळण्याची शक्यता आहे. संपूर्ण जग आधीच महागाई आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळातून जात आहे. त्यातच तेल उत्पादनात कपात केल्यास त्याचा जनतेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा शतकी पार करू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मध्य पूर्व आणि रशियाच्या निर्णयांचा सामान्य लोकांवर कसा प्रभाव पडणार तेसुद्धा जाणून घेऊयात.
OPEC+ ने कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात केल्याचा अर्थ काय?
सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली २ एप्रिलला इराक, यूएई आणि कुवेतसह मध्य पूर्वेतील देशांनी पूर्वीच्या कपातीव्यतिरिक्त पुरवठ्यात आणखी कपात करण्याची घोषणा केली. ऑक्टोबर २०२२ मध्ये यूएस सरकारने अधिक तेल पंप करण्याची मागणी केलेली असतानाच OPEC ने नोव्हेंबर २०२३ पासून अखेरपर्यंत उत्पादनात २ दशलक्ष बीपीडी कपात करणार असल्याचे सांगितले. आता करण्यात आलेल्या नव्या घोषणेनुसार सौदी अरेबियाने उत्पादनात ५००,००० बीपीडीने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. इराक मे २०२३ पासून वर्षाच्या अखेरीस २००,००० बीपीडीपेक्षा जास्त पुरवठा कमी करेल. रशिया जो OPEC+ चा देखील भाग आहे, म्हणाला की, ते २०२३ च्या शेवटपर्यंत आधी ठरवलेली उत्पादनातील कपात सुरूच ठेवणार आहे. रशियाने फेब्रुवारीमध्ये ५००,००० बीपीडी उत्पादन कपातीची घोषणा केली.