पावसाने सुरूवातीला चांगलीच हजेरी लावली. मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले. विदर्भात सध्या पूर स्थिती निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातही चांगला पाऊस झाला. कोकणात अजूनही पाऊस होत आहे. अशा वेळी मराठवाड्यात मात्र पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मात्र हवालदील झाला आहे. सुरूवातीला पाऊस चांगला झाला. मात्र त्यानंतर त्यांनी उसंत घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेकऱ्याच्या काळजाचा मात्र ठोका चुकला आहे. असा स्थिती दुबार पेरणीचे संकट त्याच्यावर कायम आहे.
मान्सूनपूर्व पावसावर विश्वास ठेवून बीडच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी पुन्हा हिरव्यागार करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. अनेक शेतकऱ्यांनी पहिल्याच पावसानंतर पेरणी केली होती. त्यामुळे यावर्षी चांगलं पिक हाती लागेल अशी त्याची भावना होती. मात्र निसर्गाच्या या अनपेक्षित फटक्याने त्यांचं स्वप्न चक्काचूर झाल्याचं चित्र आहे. जिल्ह्यातल्या अनेक भागात पेरण्या झाल्यानंतर पावसाने पाठ फिरवली आहे. अशा स्थितीत आता शेतकऱ्यांवर पुन्हा दुबार पेरणीचं संकट गडद झालं आहे. मराठवाड्यात तुलनेनं कमी पाऊस होतो. पण यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज होता. तो फसल्यामुळे शेतकऱ्याचं गणित ही फसल्याचं चित्र आहे.एकीकडे कोरड्या झालेल्या शेतातल्या मातीत पीक सुकत चाललं आहे. तर दुसरीकडे हातात पैसा नाही. पण पेरणी करायचीय अशी अवस्था प्रत्येक शेतकऱ्याची झालीय. दुबार पेरणी करायला लागली तर कुणाची मदत घ्यायची. बियाण्यासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला सतावत आहे. या संकटात कोण मदतीचा हात पुढे करणार? असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. सरकारकडून या शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा आहे. त्यात विधीमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात काही तरी आमच्या पदरात पडेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.दरम्यान मराठवाड्यासाठी (Marathwada) दिलासादायक बातमी म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले जायकवाडी धरण आता 50 टक्के भरले आहे. यामुळे मराठवाड्यातील पाणीटंचाईचीचिंता काही अंशी मिटली आहे. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांमध्ये समाधानाचे वातावरण असलं तरी हे पाणी कधी मिळणार याकडे त्यांचे लक्ष आहे. जायकवाडीमुळे मराठवाड्याची तहान भागवली जाते. शिवाय शेतीला ही पाणी दिले जाते.
