शेतीकडे सकारात्मक आणि व्यावसायिकदृष्टीने पहाण्याची आवश्यकता– विलास शिंदे
· विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबीर
लातूर, (जिमाका) : गुंतवणूकीच्या तुलनेत निर्माण होणारा रोजगार याचा विचार केला तर शेतीसारखं क्षेत्र शोधून सापडणार नाही. फक्त आता शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक आणि व्यावसायिक होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे विलास शिंदे यांनी केले. विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात ‘कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम’ या विषयावर ते बोलत होते.

तत्पूर्वी शेतीकडे पहातांना केवळ शेती करणे एवढेच मर्यादित स्वरूपात न पाहता कशापद्धतीने त्याला कृषी पूरक व्यवसायाची जोड देऊ शकतो, त्यात नावीन्यता आणता येते हे श्री. शिंदे यांनी दाखवून दिल्याचे श्री. शिंदे यांच्या परिचयात आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले. श्री. शिंदे यांनी व्यग्र दिनक्रमात मराठवाड्याच्या मातीसाठी वेळ दिल्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले. विलास शिंदे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे या कार्यक्रमास मार्गदर्शन केले.अडीच एकर-तीन एकरच्या क्षेत्राला इंडस्ट्रीसारखे बघून उत्पनादन आणि उत्पन्नाचे नियोजन करायला हवे, असे सांगून श्री. शिंदे म्हणाले की, आपल्या महाराष्ट्राचा 80 टक्के भाग कोरडवाहू आहे. शेती म्हणजे धान्य किंवा कापूस पिकवणे नव्हे. शेतीचे मूल्यवर्धन करून त्याला फार्म इंडस्ट्रीचे स्वरूप त्याला द्यायला हवे. त्यातील नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे. डिजिटल अग्रीक्लचर मार्केटिंग हे शेती व्यवसायाचे भविष्य असून आज ॲग्रो स्टार्टअप्समध्ये आयआयटी- आयआयएमवाले शिरकाव करून रोजगार निर्माण करत आहेत. परंतू आपल्याकडे शेती हा विषय आला की प्रामुख्याने त्यातील नकारात्मक बाबींवर चर्चा होते.आजच्या तरूणांना गाव सोडायचे आहे, शेती सोडायची आहे, ग्रामीण भागातील मुलगी ही शेतकरी नवरा नको म्हणते आहे, थोडक्यात काय तर शेती आणि शेती रोजगार नको अशी एक मानसिकता तयार होऊ लागली आहे. त्याची अनेक कारणं आहेत त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे शेतीचे उत्पन्न शाश्वत राहिले नाही. त्यामुळे गुंतवूणक करून, वेळ देऊन, कष्ट करून हक्काचे उत्पन्न मिळत नाही असे दिसते. त्या उलट एखाद्या नोकरीकडे आपण बघतो तर एक हमखास पगाराची रक्कम दर महिन्याला घरात येते. त्यामुळे सोपे करिअर, सुरक्षितता याकडे माणूस वळायला बघतो, तसे प्रयत्न करतो, असे श्री. शिंदे म्हणाले.एकूण लोकसंख्येच्या 50 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहाते. त्यातील 45 टक्के लोक महाराष्ट्रात शेतीवर अवलंबून आहे. या सगळ्यांनी शेती सोडली तर साधारणत: यातील 30 ते 35 टक्के युवा वर्गाला आज शेती सोडून इतर क्षेत्रात रोजगार उपलब्ध होतील, का ही एक प्रश्न आहे, सरकारी नोकरीतही मर्यादा आहेत. कंपन्यामध्ये तयार होणाऱ्या नोकऱ्यात ऑटोमेशनमुळे मर्यादा येत आहेत. खरं तर जे पुणे- मुंबईत शोधल्या जातं, अमेरिकेत शोधलं जातं त्यापेक्षा कितीतरी संधी तुमच्या भागात आसपास आहेत. फक्त गरज आहे शेतीकडे वेगळ्या नजरेने, सकारात्मकदृष्टीने बघण्याची. जगभरात जिथे समस्या तिथेच नवीन नोकऱ्या, रोजगार निर्माण झाले हे चित्र आहे, प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते त्या नजरेने शेतीकडे पाहिले तर शेतीक्षेत्राएवढ्या रोजगार संधी कोणत्याच क्षेत्रात नाहीत. तुमच्या गावात, आसपास हजारोनी अशा संधी तुम्हाला सापडतील. यात व्यक्तिगत करिअर घडवू शकता, इतरांच्या हाताला काम देऊन तुमच्या भागात समृद्धी आणू शकता. मराठवाड्यातील तरूण तरूणींनी या नजरेतून शेतीकडे पाहण्याची गरज आहे, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.
इस्त्राईल सारख्या देशाने अनेक अडचणींवर मात करत, प्रादेशिक स्थितीवर मात करत ठिबक सिंचन आणि इतर संशोधने केली ती संशोधने जगभर विकली गेली. इस्त्राईलच्या बाहेर मोठ्याप्रमाणात व्यवसाय उभे केले. जगभरातून संपत्ती गोळा केली. हीच मानसिकता आपल्याकडे तयार होण्याची गरज आहे. पाणी समस्या, उष्ण वातावरण हे इस्त्राईलमध्येही होते. पाणी नाही ही एक नवी संधी आहे, कमी पाण्यातील, कोरड्या मातीतील पिक घेण्याची. अन्न पदार्थ पोषक, पोषणमुल्याने युक्त आहे का याचा विचार आज होत आहे. लोकांना विषमुक्त शेतीतील अन्नधान्य हवं आहे. लोक साखरेचे सेवन कमी करत आहेत. जगभरात सर्वोत्तम फळं भाज्या कोरड्या वातावरणात येतात. कमी पाण्यात जास्त उत्पन्न मिळते. हे आपण पहात आहोत. अशा स्थितीत फळे, भाजीपाला, बांबू, डाळिंब असे कितीतरी कमी पाणी लागणाऱी उत्पादने मराठवाड्यात घेता येतील. जागतिक बाजारात मागणी असलेली उत्पादने घेता येतील पिकांचे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय नियोजन करता येईल. असेही श्री. शिंदे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले.