महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ स्थापना दिन उत्साहात साजरा
निलंगा(प्रतिनिधी):- महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी अंतर्गत महाराष्ट्र महाविद्यालय,निलंगा येथील प्राध्यापक डॉक्टर सुभाष बेंजलवार सर इतिहास विषयाचे जाणकार व तज्ञ यांचे व्याख्यान ठेवण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र फार्मसी चे प्राचार्य डॉक्टर एस. एस. पाटील उपस्थित होते.सदर व्याख्यानात श्री. सुभाष बेंजलवार सर यांनी विशेष मार्गदर्शन केले व तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा युवकांसाठी किती प्रेरणादायी आहे व याच्या मागला इतिहास त्यांनी योग्य पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर मांडला. स्वतंत्र भारतात निजाम कालीन राजवटी पासून मराठवाड्यातील जनतेने व तसेच आर्य समाज यांचे योगदान प्रखरतेने नमूद केले.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, मात्र त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या 565 पैकी 562 संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूरनियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . निजामाच्या जोखडातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्तीसंग्राम सुरु झाला होता. हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. दुसऱ्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान,भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे , शेषराव वाघमारे,या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला.यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. निजामाची रजाकार सैन्य लातूर जवळील कवठा व पानचिंचोली व तसेच निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे घडलेला अग्निकांड व तसेच संपूर्ण मराठवाड्यात व बिदर जिल्ह्यात रझाकार यांचे दृष्ट व्यवहार स्पष्ट केले.या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत , गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्र्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले.या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल काढणं शक्य नाही. निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले.15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते. हैदराबादचे सेनाप्रमुख जनरल अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर1948 रोजी शरणागती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला.हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्राध्यापक सुनील गरड यांनी केले.